उमेदीचे दोन शब्द -

खर तर तरुणपणात असं वाटायचं आपलं एखादी पुस्तक प्रकाशित व्हावं,  वाचनाची आवड लहानपणापासूनच असल्यामुळे असे पुस्तकांचे स्वप्न पडणे स्वाभाविक आहे.  वाचनालयात जाऊन एखाद्या नवोदित लेखक लेखकाचे पुस्तक दिसले म्हणजे ते पुस्तक घरी नेण्या अगोदर त्या लेखकाने मनोगत कसे लिहिले आहे ? हे वाचू लागलो. आपले असेच एखादे पुस्तक प्रकाशित करायचे त्या दृष्टीने कथालेखन करू लागलो. महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंकांमध्ये जसे – लोकमत, तरुण भारत, दैनिक सकाळ, विशाल विटा, दैनिक वास्तवता, कुजबुज, देशदूत इत्यादि दिवाळी अंकातून नियमित कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यात दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक तरुण भारत वगैरेंच्या कथा स्पर्धेमध्ये आमच्या कथांना प्रथम-द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले. त्यामुळेच लिहीत राहण्याचा हुरूप वाढला. अगोदर विनोदी शैलीतील लिखाण करणारे आम्ही फक्त दिवाळी अंकासाठी लिखाण केले.  मात्र जसजसे लिखाण वाढू लागले तसतशी लिखाणीची जबाबदारी वाढू लागली. आपलं लिखाण वाचक वाचतात याची जाणीव झाली. आम्ही वर्तमानपत्रात सदर लिहू लागलो. दैनिक देशदूत साठी भिकना भाऊ हे अहिराणी सदर लिहू लागलो. हे  लिखाण करीत असताना मला खानदेशातील ग्रामीण माणसाची संवाद साधण्यासाठी त्याला जवळून पाहता आले. ग्रामीण खानदेशातील शेतकरी, शेतमजूर, त्याच्या कथा, त्याच्या व्यथा, त्याचा दुष्काळ, त्याची शेती सर्व काही भयानक असं जीवन पाहता आले. आणि त्यानंतर माझ्यातली विनोदी कथा लिहिण्याची शैली थंडावली ग्रामीण  माणसाबद्दल आम्ही गंभीरपणे घेऊ लागलो. आपण ज्या भागात ज्या समाजात राहतो त्यासंबंधीच्या भागातील माणूस कसा जगतो ? हे लिहिले पाहिजे याच भावनेने आम्ही ग्रामीण कथा लिहू लागलो.

बोलीभाषेतील कथेचा दर्जा पाहण्यासाठी कुठल्याही समीक्षकाला दाखविण्यापेक्षा दिवाळी अंकात कथा पाठविण्याचा निर्णय घेतला. कारण दिवाळी अंक कथा स्पर्धेमध्ये साधारणपणे चारशे ते पाचशे कथा येत असतात. त्यातून आपल्या कथेची निवड होणे हे चांगल्या कसदार लिखाणाचे लक्षण असते. असे आम्ही समजतो. आम्ही जेवढ्या कथा लिहिल्या त्या बक्षीस पात्र ठरल्या. एवढेच नाही तर दैनिक सकाळने सलग 2005/2006/2007 या तीन वर्षाचे उत्कृष्ट कथेचे प्रथम पारितोषिक दिले.

ही एक प्रकारची आमच्या लेखनाला संजीवनी होती.  त्याला जोड म्हणजे वाचकांची पत्रे आली. त्यानंतर वाचकांचे येणारे प्रत्यक्ष फोन साक्षी ठरले. त्यानंतर पुस्तक प्रकाशित करणे, वितरणाची व्यवस्था पहाणे, त्यात येणारे आर्थिक व मानसिक श्रम, हे सर्व कष्टदायक होतं. एक लेखक-प्रकाशक होताना प्रत्येक पुस्तक काढतांना वेगळा अनुभव होता. त्याला कुटुंबाची साथ लाभली. वाचकांच्या अभिप्राय आणि माझ्या लिखाणाची आवर्जून चौकशी करणारा मित्रपरिवार यामुळेच आज मी या वेबसाईट द्वारे आपल्यापुढे सादर होत आहे.

खानदेशातील ग्रामीण, कष्टकरी माणसाच्या अतिसामान्य जगण्याला त्याच्या भाकरीच्या लढ्याला, त्याने आपली नीतिमत्ता शाबूत ठेवून, आलेल्या संकटांना तोंड देत निसर्गाशी तसेच शासनाच्या उदासीन धोरणाशी, दोन हात करताना जे धैर्य दाखवले त्याची नोंद ही कुठल्याही इतिहासात त्याची नोंद ही कुठल्याही इतिहासात होणार नसली तरी या माझ्या जननायकांची नोंद मी पुस्तक रूपाने करण्याचा प्रयत्न  केला आहे. याची नोंद वाचकांनी घ्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो…!